लेखिका साहित्‍य संमेलन

परभणी इथं 2 आणि 3 एप्रिलला दुसरं मराठवाडा लेखिका साहित्‍य संमेलन थाटात संपन्‍न झालं. मराठवाड्यातील लेखिका एकत्र याव्‍यात, नवोदित लेखिकांना मार्गदर्शन मिळावं, त्‍यांना व्‍यासपीठ मिळावं हा यामागचा मुख्‍य हेतू. विश्‍वचषक क्रिकेट स्‍पर्धेचा अंतिम सामना असतांनाही संमेलनाच्‍या उद्घाटनाला रसिकांची प्रचंड संख्‍येनं उपस्‍थिती होती. परभणीकरांनी दोन दिवस या साहित्‍य मेजवानीचा आनंदानं लाभ घेतला.

गेल्‍या 60-65 वर्षांपासून मराठी भाषा, मराठी संस्‍कृती यांच्‍या जपणुकीचं आणि निकोप वाढीचं काम मराठवाडा साहित्‍य परिषद ही संस्‍था करत आहे. या परिषदेच्‍यावतीनं लेखिका साहित्‍य संमेलनाचं आयोजन करण्‍यात आलं होतं. पहिलं संमेलन औरंगाबादला झालं. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या. परभणीतल्‍या संमेलनासाठी रेखा बैजल यांची बिनविरोध निवड झाली. संमेलनाच्‍या स्‍वागताध्‍यक्षा आमदार मीराताई कल्‍याणराव रेंगे-पाटील या होत्‍या.

मराठवाडयाला साहित्‍यिकांची फार मोठी परंपरा आहे. संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ यांच्‍यापासून ना.गो. नांदापूरकर, बी. रघुनाथ, नरहर कुरुंदकर, राम शेवाळकर अशी अनेक नावं सांगता येतील. या समृध्‍द साहित्‍य परंपरेचा वारसा जतन व्‍हावा, वृध्‍दींगत व्‍हावा, या शुध्‍द हेतूनं हे संमेलन झालं. संत जनाबाई नगरीमध्‍ये बहिणाबाई व्‍यासपीठ आणि सुहासिनी इर्लेकर व्‍यासपीठ उभारण्‍यात आलं होतं. उद्घाटनाच्‍या दिवशी म्‍हणजे 2 एप्रिलला सकाळी ग्रंथदिंडी आयोजित करण्‍यात आली होती. डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळयापासून दिंडीस प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्‍यांची आतषबाजी यामुळं परिसर दुमदुमून गेला होता. ग्रंथदिंडीच्‍या अग्रभागी अश्‍वारुढ झाशीची राणी सगळयांचं लक्ष वेधून घेत होती. संत साहित्‍याचा महिमा सांगणारे जिवंत देखावेही आकर्षणाचं केंद्र ठरलं. ठिकठिकाणी काढण्‍यात आलेल्‍या रंगीबेरंगी रांगोळया, उभारण्‍यात आलेल्‍या कमानी, प्रमुख पाहुण्‍यांचं स्‍वागत करणारे अनेक होर्डींग्‍ज यामुळं परभणीशहर भरुन गेलं होतं.

साहित्‍य संमेलनाचं उद्घाटन चित्रपट अभिनेत्री कांचन अधिकारी यांच्‍या हस्‍ते झालं. अध्‍यक्षस्‍थानी रेखा बैजल या होत्‍या. व्‍यासपीठावर माहिती संचालक श्रध्‍दा बेलसरे-खारकर, अनुराधा वैद्य, परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा कुसूमताई देशमुख, नगराध्‍यक्षा जयश्री खोबे, स्‍वागताध्‍यक्षा आमदार मीराताई रेंगे-पाटील, भावना नखाते, विमलताई सुरेश देशमुख, मराठवाडा साहित्‍य परिषदेचे अध्‍यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, दादा गोरे, कुंडलीक अतकरे, देवीदास कुलकर्णी, रमाकांत कुलकर्णी आदी उपस्‍थित होते.

महिलांनी आपल्‍या दैनंदिन व्‍यापातून अर्धा तास तरी वेळ काढून वाचलं पाहिजे, मनात येईल ते लिहिलं पाहिजे. काही दिवसांनी साहित्‍य म्‍हणजे काय हे तुम्‍हाला आपोआप कळेल, असा मौलिक सल्‍ला उद्घाटिका कांचन अधिकारी यांनी दिला. सहज सोप्‍या भाषेत त्‍यांनी उपस्‍थितांशी संवाद साधला. त्‍या म्‍हणाल्‍या, स्‍त्रियांची प्रगती होण्‍यामागं सावित्रीबाई फुले यांचं फार मोठं योगदान आहे. लेखिकांनी आपलं साहित्‍य इतर कोणाला अर्पण करण्‍याऐवजी सावित्रीबाई फुल्‍यांना अर्पण करावं, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. शिक्षणाची संधी मिळाली, आरक्षण मिळालं तरी स्‍त्री मग ती कोणत्‍याही आर्थिक स्‍तरातील असो ती स्‍वतंत्र झाली असं म्‍हणता येणार नाही. स्‍त्रियांनी आपलं स्‍वंतत्र अस्‍तित्‍व निर्माण केल्‍याशिवाय ती स्‍वतंत्र होणार नाही, असंही त्‍यांनी स्‍पष्‍ट केलं. नाट्य, चित्रपट, दूरचित्रवाहीन्‍यांसाठी ताकदवान कथावस्‍तू साहित्‍यातूनच मिळू शकते, असं मत श्रीमती अधिकारी यांनी व्‍यक्‍त केलं.

माहिती संचालक श्रध्‍दा बेलसरे यांनी साहित्‍यातील स्‍त्रिची सोशिक, पीडित प्रतिमा बदलण्‍याची आवश्‍यकता प्रतिपादन केली. इतिहासाची भीती न बाळगता, भविष्‍याची चिंता न करता आजचं वर्तमान जगायला शिका, माणूस म्‍हणून जगायला शिका, असं त्‍यांनी समस्‍त महिलावर्गाला आवाहन केलं. आपले हक्‍क, अधिकार याबाबत आत्‍मपरीक्षण करुन, आत्‍मभान जोपासा असं नमूद करुन आत्‍मसन्‍मानाचं लेखन अधिकाधिक प्रमाणात व्‍हावं, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

संमेलनाच्‍या अध्‍यक्षा रेखा बैजल यांनी श्‍लील-अश्‍लीलतेची व्‍याख्‍या सोप्‍या शब्‍दात मांडली. त्‍या म्‍हणाल्‍या, जे लिखाण आई, मुलगी, मुलगा, नात यांच्‍या समोर नि:संकोचपणं वाचलं जाऊ शकतं ते श्‍लील. या साहित्‍यात स्‍त्रिचा विकास, तिचं स्‍त्रित्‍व, तिचा स्‍व असायला हवा. तिच्‍या नैसर्गिक गुणांचं परिपोषण झालेलं हवं, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. अनुराधा वैद्य यांनीही साहित्‍यातील स्‍त्रियांच्‍या सहभागाबद्दल आपलं मत मांडलं. स्‍त्रियांची प्रगती ही प्रबोधनाशिवाय होऊ शकत नाही, असंनमूद करुन संघर्षाऐवजी समन्‍वयातून प्रगतीकडं वाटचाल होऊ शकते, असं त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी संवादिनी या स्‍मरणिकेचं प्रकाशन करण्‍यात आलं. माहिती व जनसंपर्क राज्‍यमंत्री प्रा. फौजिया खान या कार्यक्रमास येऊ न शकल्‍यामुळं त्‍यांच्‍या शुभसंदेशाचं वाचन करण्‍यात आलं.

उद्घाटनानंतर 'राजकारणातील सहभागानं स्‍त्री मुक्‍त झाली आहे का?' या विषयावर परिसंवाद झाला. यामध्‍ये डॉ॰ संध्‍याताई दुधगावकर, मंजुषा झांजरी, हेमा रसाळ, माधुरी क्षीरसागर आदींनी भाग घेतला. स्‍त्री राजकारणात असो की समाजकारणात तिला आत्‍मभान आल्‍यास ती नक्‍कीच मुक्‍त होईल, असं मत यामध्‍ये मांडण्‍यात आलं.

'मी का लिहीते?' या परिसंवादात प्राचार्य दीपा क्षीरसागर, सुनंदा गोरे, मथु सावंत, डॉ॰ उर्मिला चाकुरकर, प्राचार्य संध्‍या रंगारी, मीनल वसमतकर यांनी भाग घेतला. कविसंमेलनातही विविध कवयित्रींनी हजेरी लावून आपल्‍या कविता पेश केल्‍या.

दुस-या दिवशी म्‍हणजे 3 एप्रिलला 'मराठी साहित्‍यातील स्‍त्रीवाद' या विषयावर डॉ॰ शैला लोहिया यांच्‍या अध्‍यक्षतेखाली परिसंवाद झाला. प्रा. सावित्री चिताडे, कविता नगरे, हेमलता पाटील, स्‍नेहलता पाठक यांनी विचार मांडले. कथाकथनासही श्रोत्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनिता येलमटे, अर्चना डावरे, गवळण कलकते, निता पानसरे, पुष्‍पा नलावडे यांनी वास्‍तववादी कथा सादर करुन श्रोत्‍यांना खिळवून ठेवलं.

हे लेखिका साहित्‍य संमेलन असल्‍यामुळं मुलींची उपस्‍थिती मोठया संख्‍येनं अपेक्षित होती आणि ती तशी होतीही. त्‍यामुळं या संमेलनात किशोरी व महिला पालक मेळाव्‍याचं आयोजन करुन औचित्‍य साधण्‍यात आलं. किशोरवयीन मुलींमध्‍ये बाहय सौंदर्याची स्‍पर्धाच लागलेली दिसते. सौंदर्यप्रसाधनाच्‍या जाहिराती, साधनांची खरेदी, आरोग्‍यविषयक अज्ञान याबाबत मेळाव्‍यात उहापोह झाला. मुलींनी बाह्य सौंदर्यापेक्षा आत्‍मिक सौंदर्यावर अधिक लक्ष केंद्रीत करावं, असा सल्‍ला यावेळी देण्‍यात आला. डॉ॰ मीना परतानी, डॉ॰ सुजाता जोशी, प्रा.विजया नलावडे, प्रा. वासंती नावंदर यांनी मार्गदर्शन केलं.

समारोपास आमदार नीलम गो-हे प्रमुख पाहुण्‍या म्‍हणून उपस्‍थित होत्‍या. व्‍यासपीठावर संमेलनाध्‍यक्षा रेखा बैजल, महिला धावपटू ज्‍योती गवते, स्‍वागताध्‍यक्षा आ. मीराताई रेंगे, संध्‍याताई दुधगावकर आदींची उपस्‍थिती होती. आ. गो-हे यांनी आपल्‍या भाषणात महिलांच्‍या सर्वच प्रश्‍नांचा विस्‍तृत आढावा घेतला. मुलींची गर्भातच होणारी हत्‍या रोखण्‍यासाठी पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे, त्‍यासाठी महिलांनीच पुढाकार घ्‍यावा, असं त्‍यांनी आवर्जून सांगितलं. समाजकारण, राजकारण, साहित्‍य अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी पुढं आलं पाहिजे. सध्‍या रक्षकाऐवजी भक्षकाची संस्‍कृती वाढत असल्‍याबद्दलही चिंता व्‍यक्‍त करुन लेखिकांनी सर्वसामान्‍य महिलांना मार्गदर्शन होईल, असं लेखन करावं अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

हे लेखिका साहित्‍य संमेलन असलं तरी पुरुषवर्गाची उपस्‍थितीही लक्षणीय होती. स्‍वागताध्‍यक्षा आ. मीराताई रेंगे-पाटील यांनी पाहुण्‍यांची भोजन, निवास आणि इतर व्‍यवस्‍था यामध्‍ये कुठेही त्रुटी राहणार नाही, याची आवर्जून काळजी घेतली.

लेखिका संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन, काव्‍यसंमेलन, किशोरी मेळावा अशा भरगच्‍च सांस्‍कृतिक आणि साहित्‍यिक कार्यक्रमांची रेलचेल असल्‍यामुळं त्‍यातून परभणीकरांना विशेषत: महिलांना आत्‍मविकासासाठी निश्‍चितच बळ मिळालं असेल.

राजेंद्र सरग 9423245456